छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अज्ञात वाहनाला कारने मागून जोरदार धडक दिल्याने कार चालकाचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले. धुळे-सोलापूर महामार्गावर जंभाळा गावाजवळ रविवारी (दि.५) पहाटे २.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.या अपघातात अतुल बायगा (२५, रा. सेंदवा, जि. वडवाणी, मध्य प्रदेश) याचा मृत्यू झाला तर करण चव्हाण (२६), राहुल यादव (२९) आणि लकी रमेश (२२, सर्व रा. सेंदवा, जि. वडवाणी, मध्य प्रदेश) हे तिघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुण मारुती स्विफ्ट कारने (एम पी ०९ सीएफ ७०५६) वडवाणी (मध्य प्रदेश) येथून बारामतीकडे जात होते. दरम्यान, जंभाळा गावाजवळ अज्ञात वाहनाला कारने मागून जोराची धडक दिली. अपघातात कारमधील चारही जण जखमी झाले. ग्रामस्थांनी तात्काळ मदत करत जखमींना जगदूरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्था यांच्या रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी अतुल बायगा याला मृत घोषित केले. दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














